अन्नानंद कि ब्रम्हानंद
साधारण ५५-६० साल असेल मी इंदिरा डॉकमधे कामास होतो, राहाण्यास गिरगावात
होतो. एकदा रात्रपाळीला निघालो पान सुपारीच्या गादिवर पान घेतले व पुढे
झालो. तो दिवाळीचा आदला दिवस होता. दुस-या दिवशी सर्वांनाच घरी जायची
घाई. म्हणून आम्ही तडजोड करायचो. जवळ राहाणारे ४ वाजता घरी जाऊन फराळ
करुन ६ वाजता कामावर परत येणार. त्या दिवशी कामावर निघताना गादि जवळ एक
माणूस पटकन पुढे आला, व हात जोडून गयावया करू लागला. साहेब काहितरी द्या
ना. मी त्याला झिडकारल म्हंटल तू पैसे घेणार आणि जाऊन दारू पिणार चल जा असे
भीकारी रोजच भेटतात.
अस म्हणून मी कामावर गेलो. पहाटे ४ वाजता कामावरुन परत यायला
निघालो. घरी येऊन आंघोळ व फराळ करुन परत ६ वाजता कामावर जायचे होते,
म्हणून मी जोरातच चालत होतो. नाना शंकरशेट वाडीजवळ रात्रीचा तोच माणूस परत
पटकन पुढे आला हात जोडून उभा राहिला. साहेब नाही अजून घरी गेलो पोरांना
सांगून आलोय काहितरी घेऊनच येईन, कालपासून घरात काही नाही. आज दिवाळी आज
काही मिळाल तर घरी जाणार, नाहीतर हे तोंड घरी दाखविण्यापेक्शा चौपाटी जवळ
करावी लागेल. असे म्हणून तो रडायला लागला. त्यावेळी गिरगावात दुकाने लवकर
उघडत दिवाळीला.
मी दुकानाजवळ गेलो तोही माझ्या मागे दुकानाशी आला.
तांदूळ, गहू, रवा, गूळ, डालडा असे काही पदार्थ मी घेतले वाण्याने पिशवी
माझ्या हातात दिली. ( होय त्यावेळी ५ रू. हे सर्व सामान येत असे.) मी ती
पिशवी तशीच त्या माणसाच्या हातात दिली, आणि म्हटले जा आता घरी.
त्याने पिशवी हातात घेतली " सगळ, सगळं मी नेऊ " मी
हो म्हटले. पणं त्याने काही एकल असेल असं नाही. तो जोरात म्हणत होता आज
आम्ही जेवणार, आज आम्ही पोटभर जेवणार,
आज आम्ही गोडधोड जेवणार. असे बडबडत नाचत नाचत उड्या मारित गेला. त्याने
माझ्याकडे एकदा पाहिले, पण माझे साधे आभार मानायचेही त्याल भान नव्हते.
त्याच्या डोळ्यातला चेह-यावरचा तो आनंद अवर्णनीय
होता. असा आनंद क्वचितच अनुभवायला मिळतो. हाच का तो ब्रम्हानंद का
अन्नानंद.
लेखक
गजानन
No comments:
Post a Comment