chitika

Wednesday, 24 October 2012

सागरगोटे पट कवड्या अन् सापशिडी व्यापार मिळाले

सागरगोटे पट कवड्या अन् सापशिडी व्यापार मिळाले
साधा माळा आवरला तर कसला होतो मूर्ख कळाले

उडलो पडलो झेलत गेलो दान जाहलो गिळला गेलो
राणीचा मी बाग भासलो भायखळ्यावर लुटला गेलो
मरीन लाइन फ्लोरा फौंटन विमानतळ अन् चर्नी रस्ता
ठिकठिकाणी ठरला गेलो जरुरीवरती म्हैंगा सस्ता

तेव्हा तो व्यापार जरा मी शिकलो असतो तर आयुष्या
विनाशिडीचाही मी चढलो असतो वर सरसर आयुष्या
अश्या फेकल्या असत्या कवड्या कोटींमध्ये खेळत असतो
उडवत असतो दुर्दैवाला संधींना मी झेलत असतो

पण सांगू का......??????
पण सांगू का नाळ निरागसतेशी माझी तुटली असती
अब्जाअब्जाच्या भावांची लाखो नाती तुटली असती

चिंता नसती परवाच्या त्या जिवंत उरण्याच्या खर्चाची
चिंता असती 'कुणास सांगावे मी जिवंत आहे' याची

बालपणीच्या खेळामध्ये आयुष्याची शिकवण असते
ज्या ज्या घरास माळा असतो त्या त्या घरास घरपण असते

 

No comments:

Post a Comment