स्वप्निल डोळे!
बोलके, स्वप्निल डोळे तुझे ..
अन विखुरलेले चांदणे माझ्या आभाळात,
तुझी आवरण्याची धडपड ..
अन मी अस्ताव्यस्त...माझ्याच पुंजक्यात!
तुझी भावविभोर नजर मला शोधणारी ..
भिरभिरणारी, घाबरणारी मनांत,
पाऊलखुणा शोधते ती माझ्या ..
अन मी मात्र गुरफटलेली स्वतःच्याच अस्तित्त्वात!
ठरवले मग एकदा....
उडायचे, घुसायचे- शिरायचे तुझ्या विश्वात,
एकदा तरी फुलायचे, बहरायचे ..
नाचायचे,बेभान व्हायचे तुझ्या स्वप्नांच्या अंगणांत!
वाटली होती धाकधूक वळताना ..
त्या कोषाबाहेरच्या अनोळखी वळणातं,
पण आश्वासक तुझी नजर भिडली ..
रुतली-रुजली खोलवर माझ्या हृदयात!
विसरुन स्वतःचे अस्तित्त्व मग ..
मारली उडी तुझ्या काळ्याभोर डोळ्यांत,
सोडून सगळे पाश अन ..
हरवले, बुडाले त्या कृष्णवर्णी गहिर्या डोहात!
तिष्ठलेल्या त्या आसवांना ..
मग दिली मोकळी करुन वाट,
अन चिंबलेल्या देहासोबत ..
अनुभवली एक लोभस पहाट!
No comments:
Post a Comment