chitika

Sunday, 28 October 2012


निवृत्तीनंतर..

आता दिवसाचे चोवीस तास
फक्त माझे...माझेच आहेत
त्यात तुझेही चोवीस तास
जमा झाले आहेत!

दिवसाचे अठ्ठेचाळिस तास
संपता संपत नाहीत;
मुलांच्या रिकाम्या खोलीतून डोकावताना
किती पटकन संपले आयुष्य कळत नाही.

चमचाभर उपमा खायला
पुर्वी फुरसत नसायची
तुझ्यासाठी आणलेल्या वेणीतली
फुले कोमेजून जायची

रात्री झोपताना भविष्यातील
स्वप्नांची फुले तू माळायची
मुलांची गोड पापे घेऊन
कुशीत माझ्या विसावायची

आता...
करकरीत सकाळी
करकरीत तिन्हीसांजेला
तू मला विचारतेस,
"एक कप चहा, बशीभर उपमा करु?"
निवांत दुपारी म्हणतेस,
"चल जुने छायाचित्र संग्रह बघू"
रात्री झोपताना गुडग्याचे दुखणे विसरून हट्ट करतेस
"आता वेळ आहेच तर आपण सर्वांना भेटून येऊ!"

खरयं ग!
आता दिवसाचे चोवीस तास
तू माझी.. फक्त माझीच आहे!
मी तुला मी अन् मला तू
शेवटपर्यंत उरणार आहेस!

No comments:

Post a Comment