chitika

Wednesday, 24 October 2012

शोध 

चालली आहे कधींची सावल्यांची नेत्रपल्ली

या मनाच्या मांडवी जणू, वाढणारी विषवल्ली
भासते कधि नृत्य धीमे, गात आहे कुणि विराणी
भोवताली चाललेली बाहुल्यांची नाचगाणी

भास आहे मी म्हणू की सत्य आहे अंतरंगी
सत्य ही का भास आहे, मिथ्य आहे विविधरंगी

पाहतो त्यांचे इशारे हातवारे गूढ त्यांचे
अर्थ त्याचा मज कळेना फ़ेर धरुनी धुंद नाचे

‘ही’ खुणावे बाहुली, ‘ती’ बोलवे मजला समीप
येत आहे ती पहा पथ दाखवी घेऊन दीप

शांत आहे मी तरीही ना कळे हे काय चाले
सूत्रधारी कोण आहे वाटते गतकर्म बोले

कोणते परिमाण की जे तेच आहे सर्वकाळी
मावळे ना जे कधी वा रोज ते उगवे सकाळी

शक्य आहे की मुखीचे, बोल त्यांच्या ‘मौन’ बोले
न्यास त्यांच्या पावलांचे, स्तब्धसे पार्थीव हाले

कोण फ़ुंकी प्राण दे निष्प्राणल्या त्यांच्या शरीरी
हे असावे पद्म जलधी, जल जयाचे परि विषारी

ना कधी पडद्यापुढे का येत कोणी जो असे तो
शोध त्याचा मी करी पण सापडे ना व्यर्थ जातो

 

No comments:

Post a Comment