chitika

Sunday, 28 October 2012


एक कविता

मला आवडते
झुंजुमुंजु पहाटे होणारी
तुझ्या बांगड्यांची किणकिण
आणि निरव रात्री
झोपेत होणारा
तुझ्या पैजणांचा आवाज

मला आवडतात तुझ्या
बनारसी रेशिम साडीवरचे
जरतारी सोनेरी बुंदके
आणि राजस्थानी ओढणीचे
नरम मुलायम चंदेरी काठ!

मला आवडतो
थंडगार काळ्या फरशीवर
उमटलेला तुझ्या
चारवेढी जोडव्यांचा ओरखडा
आणि मला आवडतो
तुझ्या हनुवटीवर गोंदलेला
पाच ठिपक्यांचा डाग हिरवा!

मला आवडते
तू रंगवलेल्या मधुबनी चित्रातले
पिवळसर हिरवपोपटी रान
आणि पदराआडून दिसणार्‍या
मीरेच्या चेहर्‍यावरील उत्कट भाव!

मला आवडते
तुझ्या नाकात टोचलेल्या
बेसरबिंदीची जांभळी झाक
आणि कानात घातलेल्या
झुमक्यांची मोहक हालचाल.

मला आवडतात
घडीची पोळी उलटताना
तुझ्या नाजूक बोटांचा नाच
आणि कपाळावरची बट सारताना
तू झटकलेला पिठाचा हात.

मला आवडतो
करकरीत कच्च्या कैरीत
दात रुतवताना
तुझ्या ओठातून ओघळून
पडलेला आंबट थेंब
आणि मिठात घोळवलेली
चिंच चाखताना
घट्ट मिटलेले तुझे डोळे!

माझ्या काळ्या-पांढर्‍या-करड्या
परिटघडीच्या जगाचे
रोजच धागे उसवतात
तेंव्हा तू काढलेल्या
रुमालावरचे गच्छी टाके
माझे मन सुखावतात.

No comments:

Post a Comment