बापूजींचा मानसपुत्र
सकाळची वेळ होती. महात्मा गांधीजी दैनंदिन
प्रार्थना संपवून नुकतेच थोडेसे मोकळे झाले होते. तेवढय़ात एक स्वयंसेवक
त्यांच्या खोलीत आला. तो म्हणाला, “कुणीतरी एक तरुण तुम्हाला भेटायला
आलाय.” खरे तर आता म. गांधीजी न्याहारी करून ते लगेच सूतकताईला बसणार होते.
ते म्हणाले, “काय काम आहे त्याचं ? विचारलेस का तू त्याला ?” स्वयंसेवक
म्हणाला; विचारले; पण तो म्हणतोय, तुम्हालाच भेटायचंय.”
“ठीक आहे, पाठव त्याला”. गांधीजी म्हणाले. थोडय़ाच वेळात एक तरतरीत,
स्मार्ट युवक आत आला. गांधीजींना नमस्कार करून तो म्हणाला; “बापूजी, मी
तुमच्याकडे `काहीतरी’ मागायला आलोय. द्याल मला ?” गांधीजी चमकले. विचारात
पडले. पण त्यावेळी हे पाणी काही वेगळंच आहे हेही त्यांच्या लक्षात आले. ते
म्हणाले; “काय हवंय तुम्हाला ?” तो युवक म्हणाला; “ते मी अगोदर सांगणार
नाही. अगोदर मला तुमच्याकडून वचन हवेय की तुम्ही नाही म्हणणार नाही. मगच मी
सांगेन.” गांधीजींनी क्षणभर विचार केला; आणि ते म्हणाले; “ठीक आहे. दिलं
वचन. तू माग; तुला जे हवंय ते माग.”
हे ऐकताच तो युवक म्हणाला; “तर मग बापूजी,
आजपासून तुम्ही मला तुमचा मुलगा माना !” त्या युवकाचं हे मागणं ऐकून
बापूजी विलक्षण प्रभावित झाले. ते भारावून गेले. हा एक अत्यंत हृद्य आणि
जगावेगळा अनुभव होता. महात्मा गांधीजींवरील अतीव निष्ठेपोटीच तो युवक हे
मागणं मागत होता हे तर उघडच होतं. कोणत्याही व्यक्तिगत स्वार्थापलिकडचं हे
मागणं होतं. ते म्हणाले; “होय. मान्य आहे मला. आजपासून तू माझा मुलगा. मग
तर झालं ? अरे पण, खरं तर मी तुला यात काहीच देत नाहीये. उलट तूच मला बरंच
काही दिलं आहेस. पण तुझं नाव नाही सांगितलंस मला !”
“जमनालाल, जमनालाल बजाज नाव आहे माझं. “तो
युवक म्हणाला. त्या क्षणापासून पुढील 20/22 वर्षे म्हणजेच जीवनाच्या
अंतपार्यंत महात्मा गाधीजींच्या या दत्तक पुत्राने जमनालाल बजाज यांनी
आपल्या हातचे काहीही, अगदी कणभरसुद्धा राखून न ठेवता, आपले सर्वस्व या
पित्याला देऊन टाकले. महात्मा गांधीजींची अशी एकही चळवळ, उपक्रम, नव्हता की
ज्यात जमनालाल बजाज यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग नव्हता ! पण
महात्मा गांधीजींचे दुर्दैव हे, की आपल्या या दत्तकपुत्राचं दुर्दैवी निधन
पाहण्याचं दुःख त्यांच्या वाटय़ाला आलं होतं ! त्यावेळी गांधीजी म्हणाले
होते;
“आपल्या संपत्तीचा सार्वजनिक हितासाठी
विनियोग करणार्या शेठ जमनालाल बजाज यांच्या रूपानं आज आपण एक शूर सेवक, एक
सामर्थ्यसंपन्न सेवक गमावला आहे.
आजच्या इतके एकाकी यापूर्वी मला कधीही वाटले नव्हते.”
No comments:
Post a Comment